भाजपच्या पोस्टरवरून शहा गायब!

amit-shah
मुंबई – महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेची रणधुमाळी सुरू असताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांची छबी भाजपाच्या मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरून गायब झाली आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ नरेंद्र मोदींच्या नावाने केंद्रात भाजप सत्तेवर आले. त्यामुळे दिल्लीप्रमाणे राज्यातील भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजपने सर्व प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच जास्त भर दिला असल्याचे दिसून येत आहे. मुळात शहा यांच्या मुंबईत जाहीर सभा न घेण्याचा निर्णय भाजपाने यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे आता या शहांना मतदानापूर्वीच गाशा गुंडाळून गुजरातकडे रवाना व्हावे लागणार, अशी चर्चा आहे.

अमित शहा यांच्या इशाऱ्यावरून गेल्या २५ वर्षांची शिवसेना-युती तुटल्यामुळे भाजपमधील मराठी कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षाची सूत्रे आता अहमदाबाद आणि दिल्लीतून हलवली जात असून, मराठी नेत्यांपेक्षा तीच मंडळी वरचढ झाली आहेत, अशी तक्रारही ऐकू येते आहे. अशा परिस्थितीत शहा यांच्या सभा आणि छायाचित्रांमुळे मराठी मतदार दूर जाईल, असे भाजप नेत्यांना वाटते. त्यामुळेच त्यांची छायाचित्र जाहिरातींमध्ये न वापरण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीचे प्रचार साहित्य आणि पोस्टरवर भाजपने मोदी यांच्याबरोबरच तत्कालीन पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांची छायाचित्रेही छापली होती. संघटनात्मकबाबतीत पक्षाध्यक्षाचे स्थान भाजपमध्ये सर्वांत महत्त्वाचे मानले जाते. असे असतानाही भाजपच्या प्रचार साहित्यात शहांना स्थान नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.