राहुलच्या प्रचारसभांना उमेदवारांकडून मागणी नाही

rahul
मुंबई- काँग्रेसने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांसाठी स्टार प्रचारक म्हणून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव निवडणूक आयोगाकडे दिले असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसच्या उमेदवारांकडून राहुल यांच्या सभांसाठी अजिबात मागणी नसल्याचे समजते. परिणामी सोनिया यांचा प्रचार सभा कार्यक्रम निश्चित केला गेला असला तरी राहुल यांचा कार्यक्रम अजून ठरलेला नाही. सोनियांसाठी ३ रॅलीजची मागणी आहे मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्या दोन रॅलीज घेणार आहेत. ७ व ११ तारखेला होणार्‍या या रॅलीजची तयारी युद्धपातळीवर केली जात आहे.

काँग्रेसमधील वरीष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेतील निकालांमुळे राहुल यांच्या प्रचार सभांसाठी उमेदवार अजिबात उत्सुक नाहीत. वास्तविक महाराष्ट्रात राहुल यांच्या अनेक रॅलीज आयोजित करण्यात येणार होत्या मात्र अद्यापी एकही रॅलीचा कार्यक्रम ठरलेला नाही. त्यामानाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांच्या सभांसाठी उमेदवार आग्रही आहेत.

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मर्यादित भूमिकाच पक्ष श्रेष्ठींनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडेही महत्वाची कोणतीही जबाबदारी दिली गेलेली नाही. त्यामुळे निवडणूक प्रचाराचा बराचसा भार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे निकटचे सहकारी यांच्याच खांद्यावर आला असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Leave a Comment