राष्ट्रवादी आणि भाजपचे साटेलोटे असल्याचे आरोप तथ्यहीन ! – सुप्रिया सुळे

sule
नागपूर – महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांचे साटेलोटे आहे आणि त्यामुळेच या दोन्ही पक्षांनी एकदम युती तोडली या आरोपात काहीही तथ्य नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी केला. जर शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती शरद पवार तोडू शकतात आणि काँग्रेससोबतचीही आघाडी तोडू शकतात. तर मग शरद पवार हे निश्चितच त्या ताकदीचे नेते आहेत की, जे स्वतःच्या पक्षासोबत दुस-यांचेही पक्ष कंट्रोल करतात. यासाठी त्यांचे कौतुक करा ना, असा टोलाही खासदार सुळे यांनी यावेळी लगावला.

सुळे म्हणाल्या की, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटणे आणि शिवसेना-भाजपची युती तुटणे या दोन भिन्न घटना आहे. त्यांचा परस्परांशी आणि शरद पवारांशी काहीही संबंध नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा अधिका-यात अडसर आल्यामुळे युती आणि आघाडी यांचे विभाजन झाले. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे झाले असले तरी निवडणूकीनंतर गरज पडल्यास दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही सुळे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. आमच्या पक्षात घराणेशाही नाही. त्यामुळे विधानसभांच्या निकालानंतर पक्षाचे सर्व निवडून आलेले आमदार एकत्र बसतील आणि आपला नेता निवडतील, जर आवश्यक बहुमत असेल तर हा आमचा नेता मुख्यमंत्री बनेल अशी माहिती खा. सुळे यांनी दिली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तुम्ही होणार काय असा प्रश्न विचारला असता, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कुठेही नाही. दिल्लीत मी खूश आहे असे त्यांनी स्पष्ट केले. महिला मुख्यमंत्री होण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम पुरुषांनीच केले आहे. महात्मा फुलेंनी सावित्रीबार्इंना साक्षर केले, न्यायमूर्ती रानडेंनी रमाबार्इंना शिकविले त्यामुळेच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याकडे त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भाचे वेगळे राज्य करण्यास विरोध असला तरी विदर्भाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे खा. सुळे यांनी यावेळी सांगितले. विदर्भाचा विकासाचा एक लाख कोटीचा अनुशेष असल्याचे मान्य करीत आम्हाला एका हाती सत्ता मिळाल्यास आम्ही हा अनुशेष दूर करून विकासाचा कालबद्ध कार्यक्रम घेऊन जनतेसमोर येऊ असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.