उद्धव ठाकरेंना गुजराती मतांची चिंता; मात्र भाजपवर टिका सुरूच !

uddhav
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवरील आपली टिका सुरूच ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेश भाजप नेत्यांवर यथेच्छ तोंडसुख घेतांना ठाकरे यांनी गुजराती समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला. १९९२-९३ च्या मुंबई दंगलीत शिवसेना नसती तर मुंबईतील गुजराती समाजाला मुंबई सोडून जावे लागले असते. शिवसेनेमुळे ते सुरक्षित राहिले आहेत असे ते म्हणाले.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर बाळासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारले जाईल आणि त्यासाठी इतर कोणत्याही पक्षाची मदत घेणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप प्रचार करत असल्याचे सांगून देखील त्यांनी टिका केली. ते म्हणाले की, दिल्लीसमोर डोके टेकण्याची शिकवण आम्हाला महाराजांनी दिलेली नाही. निवडणूक आचारसंहितेमुळेच दसरा मेळावा घेता आला नाही असा खुलासा त्यांनी केला. कॉंग्रेस राष्ट्रवादीवर टिका करतांना ते म्हणाले की, आरटीआय मधून माहिती घेऊन जयललितांप्रमाणे पृथ्वीराज चव्हाणांना तुरुंगात टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सत्ता आल्यानंतर आम्ही सर्व घोटाळ्यांची चौकशी करणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी मेळाव्याला बोरीवली मधील आरपीआय नेते राम पंडागळे, अर्जुन डांगळे देखील उपस्थित होते.