दादा करणार बाबांनी घेतलेल्या निर्णयांच्या चौकशीची मागणी

ajit-pawar
नागपूर : पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना शेवटच्या सहा महिन्यात घेतलेल्या निर्णयांची आणि मंजूर केलेल्या फाईल्सची चौकशी करण्याची मागणी करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले.

ते पुढे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याच्या अनेक फाईल्स मंजूर करण्यात आल्या असून, या दोन खात्यांचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. काहीवेळेला केवळ एखादा निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांसाठी अध्यादेश काढण्यात आला. तो निर्णय झाल्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी अध्यादेश मागे घेण्यात आला. हे सर्व कसे काय घडले, याची माहिती आपण मागविलेली आहे आणि १९ ऑक्टोबरला निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहोत. गेल्या तीन वर्षांत अनेक निर्णय स्वाक्षरीसाठी रोखून धरणारे पृथ्वीराज चव्हाण आत्ता स्वाक्षरी करण्याची जाहिरात का करताहेत, असाही खोचक प्रश्न त्यांनी विचारला.

सध्या वृत्तवाहिन्यांवर सर्वाधिक जाहिराती कॉंग्रेसच्या प्रसारित होत असल्याचा आरोप करून पवार म्हणाले, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातही कॉंग्रेसने कधी त्यांच्या इतक्या जाहिराती केल्या नव्हत्या. स्वतः सोनिया गांधी यांच्यासुद्धा इतक्या जाहिराती प्रसारित झालेल्या नाहीत. मग आत्ताच इतक्या जाहिराती का येत आहेत. या जाहिरातींसाठी काँग्रेसकडे एवढा पैसा आला कुठून ?, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.