मधुकर पिचड यांनी लपविली जात; चौकशीची मागणी

pichad
मुंबई – नागपूर येथील आदिम संविधान संरक्षण समितीने आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आपली मूळ जात लपवून जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केले असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली असून याविरोधात आम्ही लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समितीच्या नंदा पराते यांनी सांगितले.

पिचड हे आदिवासी विकासमंत्री असून त्यांनी स्वत:चाच जास्त विकास केला आहे. त्यांनी हलवा, धनगर, गोवारी या आदिवासींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले असून आपल्या उच्च पदाचा फायदा उचलत त्यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोपही पराते यांनी केला आहे.

पिचड यांचे वडील देशमुख आडनाव लावत असत आणि त्यांच्या जातीच्या दाखल्यावर कोळी जात नमूद करण्यात आली आहे. असे असताना पिचड यांनी हिंदू महादेव कोळी अशी जातीची नोंद करत जात प्रमाणपत्र घेतले आहे. घटनेनुसार ज्या जातींना आरक्षण दिलेले आहे त्यामध्ये या दोन्ही जातींचा समावेश नाही. घटनेनुसार अनुक्रमांक 29 वर कोळी महादेव जातीचा समावेश असतानाही जात प्रमाणपत्र देणा-या समितीने वेगळी बाब म्हणून हिंदू महादेव कोळी असे जात प्रमाणपत्र देत असल्याचे नमूद करीत जात प्रमाणपत्र दिल्याचेही उघडकीस आले आहे. मधुकर पिचड यांनी शाळा सोडल्याचा दाखला यासाठी दिला. मात्र, त्या दाखल्यावरही हिंदू महादेव कोळी असा उल्लेख आहे.जात वैधता तपासताना मधुकर पिचड यांच्या 1950 पूर्वीच्या कोळी जातीच्या सबळ पुराव्याकडे जात तपासणी समितीने दुर्लक्ष केल्याचेही दिसून येत आहे.