दिलासा … पासपोर्टसाठी आता घरभाड्याचा करार पुराव्यासाठी ग्राह्य !

passport
पुणे – पासपोर्टसाठी आता घरभाड्याचा करार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे ,तसा निर्णय पासपोर्ट विभागाने घेतला आहे. त्यामुळेच, नोकरी अथवा शिक्षणानिमित्त स्थलांतरित नागरिकांना दिलासा मिळाला आहे शिवाय पासपोर्ट काढताना भेडसावणाऱ्या समस्यांतूनही सुटका होणार आहे.

पासपोर्टच्या पुराव्यांमध्ये घराभाडे करार मान्य नसल्याने रहिवासी पुरावा देताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते , अनेकवेळा ज्या कंपनीत काम करतात ती कंपनीदेखील रहिवासी पुराव्याचे पत्र देत नाही.असा अनुभ अनेकांचा आहे . त्यामुळे येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी पासपोर्ट पुराव्यात अधिकृत घरभाडे करार ग्राह्य धरावा, अशी मागणी पुणे पासपोर्ट कार्यालयातर्फे करण्यात आली होती. त्यावर दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने या पुराव्याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्याची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर घरभाडे करार हा रहिवासी पुरावा म्हणून स्वीकारला जाणार आहे.

देशातील पासपोर्ट अधिकाऱ्यांची दिल्लीतील जवाहरलाल नेहरू भवन येथे तीन दिवसांची परिषद नुकतीच परराष्ट्र मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आली होती. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले. पासपोर्ट सेवा केंद्रांकडे झालेली कामाची विभागणी आणि पासपोर्ट प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत आलेले अनुभव, पासपोर्ट प्रक्रियेत अधिकाऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणी, त्रुटी आणि नागरिकांच्या अपेक्षांबद्दल त्या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.