कोसळण्यापूर्वी मलेशियन विमान ऑटोपायलटवर

airoplane
सिडनी – मलेशिया एअरलाइन्सचे अचानक बेपत्ता झालेले एमएच-३७0 हे प्रवासी विमान त्याच्या अंतिम समयी ऑटोपायलट अर्थात स्वयंचलित यंत्रणेवर उडत होते, अशी नवी माहिती समोर आली आहे.

या विमानाच्या शोधमोहिमेचे नेतृत्व करणार्‍या ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली असून, शोधमोहिमेची व्याप्ती हिंद महासागरात दक्षिणेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मार्च महिन्यातील ८ तारखेच्या रात्री क्लालालंपूरहून बीजिंगला जाण्यासाठी निघालेले हे विमान २३९ प्रवासी-कर्मचार्‍यांसह अचानक रडारवरून गायब झाले होते. मलेशिया एअरलाइन्सच्या या विमानाचा थांगपत्ता लावण्यासाठी जवळपास १0 देशांनी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली. एमएच-३७0 हिंद महासागरात कोसळले असून, त्यामधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आलेली आहे; परंतु अद्यापही त्याचे अवशेष सापडले नसल्यामुळे अपघाताचे नेमके ठिकाण, कारण समजू शकलेले नाही. या शोधमोहिमेचे नेतृत्व करणार्‍या ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतच्या माहितीवर एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातील माहिती ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान वॉरेन ट्रस यांनी गुरुवारी सांगितली. त्यानुसार हे विमान समुद्रात पडण्यापूर्वी ऑटोपायलट यंत्रणेवर उडत होते, असा दावा करण्यात आला आहे.

Leave a Comment