‘अच्छे दिन ‘;मोदी आणि भाजपविरोधात जनहित याचिका

justice
मुंबई – लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चा नारा बराच गाजला ,साहजिकच सत्तांतर झाल्याने जनतेच्या नव्या सरकारकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र तसे दृष्टीक्षेपात येत नसल्याने एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयाची पायरी चढली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘अच्छे दिन आने वाले है’ अशी जाहीरात करुन देशात सत्ता काबिज केली. मात्र एक महिना झाला तरी काहीच चांगले निष्पन्न होत नसून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मुंबईतील ऑल इंडिया अँटी करप्शन अँड सिटीजन वेल्फेअर कोअर कमिटीचे संस्थापक अॅडव्होकेट एम. व्ही. होल्मागी यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक आणि ए. चांदुरकर यांच्या खंडपिठाकडे ही जनहित याचिका दाखल केली आहे.या नविन सरकारने रेल्वे तिकीट दरवाढ केली असून अन्य क्षेत्रातही महागाई केल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. नविन सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. मात्र जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात नविन सरकार अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे होल्मागी यांनी केली आहे.