मुलांसाठी दत्ता मेघे यांची कॉंग्रेसला ‘सोडचिठ्ठी’

dattameghe
नागपूर – मुलांच्या राजकीय करिअरसाठी भाजपमध्ये जाण्यासाठी कॉंग्रेसचे जेष्ट नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांनी कॉंग्रेसला ‘सोडचिठ्ठी ‘दिली आहे, पुढील महिन्यात ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात पुत्राच्या पराभवानंतर भाजपचे वेध लागलेले ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी आज, सोमवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मेघे यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना एका ओळीचे पत्र पाठविले असून कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि क्रियाशील सदस्यत्वाचा स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते.

मात्र, काही वर्षांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मेघे यांचे सुपुत्र सागर मेघे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. यामुळे सुधीर मेघे आणि सागर मेघे या आपल्या दोन मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी दत्ता मेघे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे . भाजप नेते नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने मेघे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत . मेघे यांचा त्यांचे पुत्र सागर व समीर यांच्यासह येत्या ५ जुलैला भाजपचा प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे.