‘फेसबुक – वॉट्स अ‍ॅप’ जरा जपून , लाईक महागात पडू शकते – गृहमंत्री

facebook2
मुंबई – फेसबुक आणि वॉट्स अ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकणारे आणि तो मजकूर लाईक व शेअर करणा-यांवरही गुन्हा दाखल केला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.

फेसबुकवर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने गेले काही दिवस राज्यभरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील मोहसिन शेख या इंजिनिअर तरुणाचा या आक्षेपार्ह फोटोप्रकरणाशी काडीचाही संबंध नव्हता. तरीही त्याचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आर.आऱ. पाटील यांनी सोशल नेटवर्किंग साईट्चा गैरवापर करणा-यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.तसेच हिंदू राष्ट्र सेनेवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. पोलिस या संघटनेविरोधात पुरावे गोळा करत आहे. हिंदू राष्ट्र सेना आणि संघटनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यावर बंदीची कारवाई करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आणखीन दोनजण अटकेत – दरम्यान ,गेल्या आठवडयात हडपसरमध्ये झालेल्या मोहसीन शेख या तरुणाच्या हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी हिंदू राष्ट्र सेनेशी संबंधित आहेत.फेसबुकवर महापुरुषांची बदनामी करणारी पोस्ट टाकल्यानंतर पुण्यामध्ये तणाव निर्माण झालेला असताना, मोहसीन शेख या तरुणाची हत्या झाली होती. पेशाने आयटी तज्ञ असणारा मोहसीन घरी परतत असताना, जमावाने त्याला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली होती. यात मोहसीनचा मृत्यू झाला होता.मोहसीन मूळचा सोलापूरचा होता. त्याचा या वादाशी काहीही संबंध नव्हता. तो नोकरीसाठी पुण्यात रहात होता. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांवर मोहसीनची हत्या केल्याचा आरोप आहे. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाईसह या प्रकरणी आतापर्यंत १९ जणांना अटक झाली आहे.

Leave a Comment