Pak vs NZ : फखर जमानचे झंझावाती शतक, पाकिस्तानने 103 दिवसांनंतर जिंकला वनडे सामना


फखर जमानच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने 103 दिवसांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजय मिळवला. रावळपिंडीत न्यूझीलंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तानने 5 गडी राखून जिंकला. पाकिस्तानने 103 दिवसांनी एकदिवसीय सामना खेळला आणि तो जिंकण्यातही त्यांना यश आले. पाकिस्तानने जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पाकिस्तानचा हा 500 वा एकदिवसीय विजय आहे.

रावळपिंडीतील विजयासह बाबर आझमच्या संघाने 5 सामन्यांच्या मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना डॅरेल मिशेलचे शतक आणि विल यंगच्या अर्धशतकाच्या जोरावर किवी संघाने 7 बाद 288 धावा केल्या. मिचेलने 115 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह 113 धावा फटकावल्या. त्याचवेळी यंगने 78 चेंडूत 86 धावांची खेळी केली. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले.

यंग आणि मिशेल यांच्याशिवाय न्यूझीलंडकडून अन्य कोणताही फलंदाज धावा करू शकला नाही. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ यांना 2-2 यश मिळाले, तर शादाब खानने एक विकेट घेतली. 289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची सुरुवात दमदार झाली. फखर आणि इमाम-उल-हक यांच्यात 124 धावांची भागीदारी झाली. इमामने 60 धावा केल्या.


सलामीवीर इमाम पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बाबर आझमने 49 धावा करत फखरला साथ दिली. बाबरच्या रूपाने पाकिस्तानला 214 धावांवर दुसरा धक्का बसला. मात्र, शान मसूदची बॅट फ्लॉप ठरली. त्याला केवळ 1 धाव करता आली. संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणल्यानंतर फखरही 42.2 षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला.

पाकिस्तानच्या 255 धावांत 4 विकेट पडल्यानंतर मोहम्मद रिझवानने जबाबदारी स्वीकारली. यादरम्यान आगा सलमानही बाद झाला, पण रिझवान एका टोकाला उभा राहिला आणि संघाला विजय मिळवून देऊनच परतला. रिझवानने 34 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या.