चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय कन्यांचा जोरदार डान्स, पाहा ICC चा VIDEO


भारतीय संघ 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीत चॅम्पियन बनला आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. विजयानंतर भारतीय संघाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वास्तविक, भारतीय खेळाडूंनी विजयानंतर ‘काला चष्मा’ गाण्यावर खूप डान्स केला. त्याचा व्हिडिओ आयसीसीनेच शेअर केला आहे.


भारतीय अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनल्या आहेत. टीम इंडियाने फायनलमध्ये इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेची ही पहिलीच आवृत्ती आहे आणि भारताने तो जिंकून इतिहास रचला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ 68 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने 14 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.


भारतासोबत विचित्र योगायोग
भारतीय महिला संघाप्रमाणेच, गेल्या वर्षीच्या पुरुषांच्या अंडर-19 विश्वचषकात, भारताने अंतिम फेरीत इंग्लंडला पराभूत केले आणि चॅम्पियन बनले. भारतीय 19 वर्षांखालील पुरुष आणि महिला दोन्ही संघ इंग्लंडला हरवून चॅम्पियन बनले हा विचित्र योगायोग आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. मात्र, ती स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली होती.

भारताला देण्यात आले ‘ड’ गटात स्थान
भारताला ड गटात दक्षिण आफ्रिका, यूएई आणि स्कॉटलंडसह ठेवण्यात आले होते. ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. यानंतर यूएईचा भारताने 122 धावांनी तर स्कॉटलंडचा 83 धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला.

सुपर सिक्समधील एकमेव पराभव
सुपर-सिक्स टप्प्यातील ग्रुप-1 मधील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने सात गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाचा या स्पर्धेतील हा पहिला आणि एकमेव पराभव होता. यानंतर, सुपर सिक्सच्याच दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेच्या संघाचा सात विकेट राखून पराभव केला आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. भारतीय संघ सात गडी राखून अंतिम सामना जिंकून चॅम्पियन ठरला.

अनेक खेळाडूंची होऊ शकते वरिष्ठ संघात निवड
पुढील महिन्यात होणाऱ्या सीनियर महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या अंडर-19 संघातील अनेक खेळाडूंची भारतीय संघात निवड होऊ शकते. शेफाली वर्मा व्यतिरिक्त श्वेता सेहरावत, पार्श्वी चोप्रा आणि ऋचा घोष या खेळाडूंना वरिष्ठ संघात स्थान मिळू शकते.