रोनाल्डो एका वर्षात कमवणार 1800 कोटी, टीम इंडियाच्या सर्वात महागड्या क्रिकेटरला एवढा पैसा कमवायला लागतील 150 वर्षे


जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो त्याच्या कमाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रोनाल्डोने युरोपचा फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला आणि सौदी अरेबियाच्या फुटबॉल क्लब अल नास्त्रात सामील झाला. रोनाल्डो आणि अल नास्त्रा यांच्यातील कराराकडे क्रीडा जगतातील सर्वात महागडा करार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत फुटबॉलसारख्या खेळासमोर क्रिकेट कुठेही टिकत नाही, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

सौदी अरेबियाच्या अल नस्त्रा क्लबच्या वतीने खेळण्यासाठी रोनाल्डोला दरवर्षी 1800 कोटी रुपये मिळतील. पण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूला इतके पैसे कमवण्यासाठी जवळपास 150 वर्षे क्रिकेट खेळावे लागेल. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, क्रिकेट जगभर कितीही लोकप्रिय झाले असले तरी फुटबॉलच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा हे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून खेळत आहेत. रोहित शर्मा कमाई करण्यात आघाडीवर आहे. रोहित शर्माने आयपीएलचे 15 सीझन खेळून 178 कोटी रुपये कमावले आहेत. त्याची सरासरी काढली तर रोहित शर्मा आयपीएल खेळून दरवर्षी सुमारे 12 कोटी रुपये कमावतो. त्यामुळे 1800 कोटी रुपये कमवण्यासाठी रोहित शर्माला 150 वर्षे आयपीएल खेळावे लागणार आहे.

क्रिकेटच्या खूप पुढे आहे फुटबॉलचे जग
बाकी खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर धोनीने आयपीएलचे 15 सीझन खेळून 176 कोटी रुपये कमावले आहेत. तर विराट कोहलीने आयपीएलचे 15 सीझन खेळून 173 कोटींची कमाई केली आहे. रवींद्र जडेजाने आयपीएलमधून 109 कोटींची कमाई केली आहे. आयपीएलमधून 100 कोटींहून अधिक कमाई करणारे केवळ सात खेळाडू आहेत.

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, रोनाल्डो आणि मेस्सी सारखे खेळाडू एका वर्षात क्लबशी करार करून जितके कमावतात, तितकी कमाई कोणताही क्रिकेटपटू त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत करू शकत नाही. आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूची कमाई फक्त 18 कोटी रुपये आहे. रोनाल्डोच्या एका वर्षाच्या कमाईची बरोबरी करण्यासाठी त्या खेळाडूला 100 वर्षे आयपीएल खेळावे लागेल.