जगातल्या पहिल्या नेझल करोना लसीला भारत सरकारची मंजुरी

जगातील पहिली नाकावाटे देण्यात येणारी करोना लस,कोवॅक्सीन बनविणाऱ्या हैद्राबादच्या भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने तयार केली असून सध्या ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे. या लसीला भारत सरकारने मंजुरी दिली आहे आणि सध्या खासगी रुग्णालयात ही लस उपलब्ध केली गेली आहे. सध्या ही लस नागरिकांना विकत घ्यावी लागणार आहे. भारत बायोटेकने  ‘इनकोवॅक’ नावाने ही लस बाजारात आणली आहे. पूर्वी या लसीचे नाव बीबीव्ही १५४ असे होते.

ही लस नाकातून स्प्रे रुपात दिली जाणार आहे. त्यामुळे शरीरात जाताच करोना संसर्ग वा त्याचा शरीरात प्रसार ब्लॉक होणार आहे. ही लस देण्यासाठी इंजेक्शनची गरज नाही व त्यामुळे जखम होण्याचा धोका नाही. हेल्थकेअर वर्करना त्यासाठी वेगळे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. या लसीमुळे श्वसनातून संक्रमण होण्याचा धोका कमी होणार आहे. तसेच लस वाया जाण्याची भीती रहाणार नाही. दंडात इंजेक्शनने दिल्या जाणाऱ्या लसीला इंट्रामस्क्युलर तर स्प्रे प्रमाणे नाकात देण्याच्या लसीला इंट्रानेझल म्हटले जाते.

ही लस थेट नाकातील म्युकोसा मधे प्रतिरोध निर्माण करते त्यामुळे शरीरात इम्युनोग्लोब्युनील तयार होते. यामुळे पहिल्या स्टेजमध्येच संसर्ग रोखला जातो आणि प्रसारही रोखला जातो. भारतात सध्या आठ प्रकारच्या करोना लस दिल्या जात असून त्या सर्व दोन डोस आणि इंट्रामस्क्युलर आहेत. नाकातील लस सिंगल डोस असून त्याचे ट्रॅकिंग करणे सुलभ आहे. तिचा प्रभाव १४ दिवसात दिसतो आणि दुष्परिणाम कमी आहेत. शिवाय सुई आणि सिरींजचा कचरा कमी होतो. भारत बायोटेकचे डॉ. कृष्णा एल्ला यांनी या लसीचे चार थेंब पुरेसे असून दोन्ही नाकपुड्यातून दोन दोन थेंब दिले जाणार आहेत असे संगितले.