फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे मेस्सी कडून कोडकौतुक

कतर येथील फिफा वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत चँपियनशिप मिळवून आर्जेन्टिनाचे आणि कप्तान लियोनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झाले. ३६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेल्या या ट्रॉफीचे स्वदेशी जोरदार स्वागत झालेच पण कप्तान मेस्सी या ट्रॉफीवर स्वतःचा मुलाप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करत असल्याचे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत. मेस्सीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत बेडवर ट्रॉफी शेजारी घेऊन झोपलेला मेस्सी दिसतो आहे तर अन्य फोटोत त्याने ट्रॉफी छातीशी धरलेली दिसत आहे. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हसू लोकांना फारच भावले आहे. या फोटोंवर कॉमेंटस चा अक्षरशः पाउस पडला आहे. त्याचबरोबर मेस्सी दोन वेळा गोल्डन बॉल मिळविणारा जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

मेस्सीचे विजयी ट्रॉफी स्वीकारतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर मोस्ट लाईक्ड फोटो ठरला असून त्याला ६.७ कोटी लाईक मिळाले आहेत. मंगळवारी पहाटे तीन वाजता विजयी टीम मायदेशी पोहोचली तेव्हा सारा देश जागा होता आणि ४० लाख लोक राजधानी मध्ये स्वागताला जमले होते. मंगळवारी आर्जेन्टिना मध्ये राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली गेली. विजयी टीम चा ११ किमीचा रोड शो झाला.

लियोनेल मेस्सी हा शांत स्वभावाचा खेळाडू आहे. आलिशान घर, हॉटेल, खासगी विमान त्याच्या मालकीची असून त्याची संपत्ती ४९५२ कोटींची आहे. २०२१-२२ मध्ये तो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. मेस्सीच्या खासगी आयुष्याचा भंग होऊ नये म्हणून त्याच्या घरावरून कोणत्याही विमान उड्डाणास परवानगी दिली जात नाही असेही समजते.