ट्विटर सीईओच्या खुर्चीवरून पायउतार होणार मस्क

टेस्लाचे मालक आणि ट्विटरचे सीईओ एलोन मस्क अखेर ट्विटर सीईओ पदाच्या खुर्चीवरून पायउतार होणार आहेत. मस्क यांनी ट्वीट करून या संदर्भात घोषणा केली आहे. आपल्या ट्वीट मध्ये मस्क म्हणतात,’ या कामासाठी कुणीतरी मूर्ख मिळाला की सीईओची खुर्ची सोडणार आहे. नंतर फक्त सर्व्हर आणि सॉफ्टवेअर टीमचे काम पाहणार आहे.’

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी म्हणजे १९ डिसेंबर रोजी मस्क यांनी एक पोल घेतला होता आणि त्यात युजर्सना ट्विटर सीईओ पदाचा मी राजीनामा द्यावा का यावर मत देण्यास सांगितले होते. या पोल मध्ये १७,५०२,३९१ लोकांनी मत दिले आणि त्यातील ५७.५ टक्के जणांनी मस्क यांनी ट्विटर सीईओ पदाचा राजीनामा द्यावा असे मत दिले होते. त्यामुळे मस्क खरोखर या सल्ल्याचा विचार करून खुर्ची खाली करणार का या बाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

काही काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेल्या एलोन मस्क यांनी प्रथम एप्रिल मध्ये ट्विटर खरेदी करत असल्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर या डील मधून माघार घेतल्याचे जाहीर केले होते. पण अखेरी ऑक्टोबर मध्ये त्यांनी ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटर खरेदी केले. मस्क नवीन गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत आहेत असेही सांगितले जात आहे. ट्विटर खरेदी केल्यापासून सतत काही ना काही घडामोडी सुरु आहेत. कर्मचारी कपात, ब्लू स्टिक साठी पैसे यामुळे मस्क सतत वादात राहिले आहेत.