कुटुंबियांसह पुतीन बंकरवासी होण्याच्या तयारीत

द मिररने दिलेल्या एका बातमीनुसार रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन त्यांच्या कुटुंबासह युराल पहाडात असलेल्या गुप्त बंकर मध्ये राहण्यास जाण्याच्या तयारीत आहेत. युक्रेन रशिया युद्ध अजून संपलेले नाही आणि पुतीन युक्रेनवर अण्वस्त्रे डागण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु असतानाच रशियावर सुद्धा असे हल्ले होऊ शकतात हे लक्षात घेऊन पुतीन यांना सुरक्षेसाठी अज्ञातवासात जाण्याची इच्छा असल्याचे एकीकडे सांगितले जात आहे तर दुसरीकडे हिवाळा तोंडावर आला असून पुन्हा कोविड १९ चा उद्रेक होण्याची भीती आणि रशियात सध्या थैमान घालत असलेली फ्यु आणि स्वाईन फ्ल्यूची जोरदार साथ यामुळे पुतीन बंकर मध्ये राहण्यास जाणार असल्याचे दावे केले जात आहेत.

गेल्या दहा वर्षात प्रथमच पुतीन यांनी दरवर्षी डिसेंबर मध्ये घेतली जाणारी सेट पीस परिषद रद्द केली आहे. नेहमी पुतीन या परिषदेत वार्षिक संबोधन करतात आणि पत्रकार त्यांना स्थानिक, विदेशी धोरणांवर प्रश्न विचारू शकतात. या परिषदेतून पुतीन आपली प्रतिमा उजळवून घेण्याचा उद्देश साध्य करत असतात. मात्र पुतीन यांची तब्येत ठीक नसल्याच्या बातम्या वारंवार माध्यमातून येत आहेत. त्यांना कॅन्सर, पार्किन्सन झाला असल्याचे दावे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पुतीन त्यांच्या राहत्या घरात जिन्यावरून घसरून पडल्याचे पण अंगरक्षक जवळ असल्याने त्यांना फारशी इजा झाली नसल्याचे सुद्धा सांगितले जात आहे.