मेस्सी कि इम्बाप्पे, कोण उचलणार फिफा वर्ल्ड कप ट्रॉफी?

कतार येथे सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप सामन्यांची सांगता आता १८ डिसेंबर रोजी अंतिम फेरीचा सामना झाल्यावर होणार आहे. आर्जेन्टिना आणि फ्रांस या दोन बलाढ्य संघात ही चुरशीची लढत होणार असून यावेळी वर्ल्ड कप ट्रॉफी आर्जेन्टिनाचा स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी उचलणार कि फ्रांसचा अगदी मस्त फॉर्म मध्ये असलेला स्टार खेळाडू किलीयमन इम्बाप्पे उचलणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. आर्जेन्टिना ने क्रोएशियाला हरवून तर फ्रांसने मोरोक्कोला हरवून अंतिम फेरी गाठली आहे.

विशेष बाब म्हणजे मेस्सीने या सामन्यानंतर वर्ल्ड कप मधून संन्यास घेणार असल्याचे सूचित केले आहे आणि नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार मेस्सीला पायाच्या स्नायूच्या दुखण्याने बेजार केले आहे. क्रोएशिया विरुद्ध खेळताना मेस्सी अनेकदा हॅमस्ट्रिंगवर दाबत असताना दिसला होता. गुरुवारी त्याने सरावात सहभाग घेतला नाही मात्र थोडा आराम मिळाल्यावर तो अंतिम सामन्यात खेळेल असे सांगितले जात आहे. मेस्सीला वर्ल्ड कप जिंकायची ही अखेरची संधी आहे.

फ्रांस सलग दुसर्या वेळी अंतिम फेरीत आले असून २०१८ मध्ये रशियात झालेल्या वर्ल्ड कप मध्ये फ्रांसने क्रोएशियाला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. इम्बाप्पे सध्या खूपच चांगल्या फॉर्म मध्ये असून त्याने आत्तापर्यंत पाच गोल केले आहेत. मेस्सीचे सुद्धा पाच गोल आहेत. त्यामुळे हे दोघेही गोल्डन बूट अॅवॉर्ड साठीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. २०२२ या वर्षात मेस्सीची कमाई १०७३ कोटींची आहे तर इम्बाप्पेने ३५० कोटी कमावले आहेत. दोन्ही टीमनी दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. मात्र आर्जेन्टिनाला मेरडोनाच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या वर्ल्ड कप  नंतर ३६ वर्षांनी ही संधी पुन्हा मिळाली आहे. फ्रांसने १९९८ आणि २०१८ असा दोन वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.