म्हणून पुढे ढकलल्या जात आहेत चित्रपटांच्या रिलीज डेट

बॉलीवूडसाठी २०२२ वर्ष सरत आले असूनही फारसे फायद्याचे ठरलेले नाही. करोना काळ ओसरल्यावर धडाक्याने अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज झाले पण त्यातील अनेक फ्लॉप ठरल्याचे अनुभव आले. परिणामी अनेक चित्रपट निर्माते सावध झाले असून एका पाठोपाठ एक बिग बजेट चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या जाऊ लागल्या आहेत.

दक्षिणेकडील लोकप्रिय अभिनेता प्रभास याचा आदिपुरुष जानेवारी २०२३ ऐवजी जून २०२३ मध्ये रिलीज होणार आहे तर सलमान खानचा टायगर ३ पुढच्या वर्षीच्या ईद ऐवजी दिवाळीला आणि किसी का भाई किसी कि जान ३१ डिसेंबर २०२२ ऐवजी पुढच्या ईद ला प्रकाशित होणार आहे. या शिवाय कतरिना कैफचा मेरी क्रिसमस, टायगर श्रॉफचा गणपत यंदाच्या नाताळऐवजी नंतर प्रकाशित होणार आहेत त्यांच्या तारखा जाहीर केल्या गेलेल्या नाहीत. यंदा नाताळ मध्ये रणवीरचा सर्कस रिलीज होईल. २०२३ च्या व्हेलेंटाइन डे ला प्रकाशित होणारा रॉकी आणि राणीकी प्रेम कहाणीची रिलीज डेटही पुढे ढकलली गेली आहे.

चित्रपट रिलीज डेट पुढे ढकलण्याबाबत निर्माते अनेक कारणे सांगत असले तरी या क्षेत्रातील तज्ञ आणि विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार करोना तिसऱ्या लाटेनंतर चित्रपट गृहे उघडली आणि चित्रपट मोठ्या संखेने रिलीज झाले पण निर्मात्यांच्या हाती निराशाच लागली आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मूड बदलेपर्यंत बिग बजेट चित्रपट रिलीज करण्यास कुणी तयार नाही. चित्रपट रिलीज करण्यापूर्वी बाजारातून फीडबॅक घेतला जाईल आणि मगच हे चित्रपट थियेटर मध्ये येतील.