या शहरात सायकल चोऱ्यामुळे नागरिक आणि पोलीस दोघेही हैराण

कॅनडाच्या सीमेवर ४५ हजाराची लोकवस्ती असलेल्या अमेरिकेतील बर्लिंगटन शहरातील नागरिक आणि पोलीस तेथे होत असलेल्या सायकल चोऱ्यांमुळे हैराण झाले आहेत. गेले काही महिने घरातून, गॅरेज मधून, बाजारातून अश्या सगळ्या ठिकाणाहून सायकली चोरल्या जात आहेत. काही सायकली तर सहा सहा वेळा चोरीला गेल्या आहेत. युनिव्हर्सटी ऑफ व्हरमौंट मधील विद्यार्थ्यांना सायकल चोरांपासून सावध राहण्याचा इशारा दिला गेला आहे. या ठिकाणाहून किमान २२० सायकली चोरीला गेल्या आहेत. त्यांची किंमत अंदाजे दीड कोटी रुपये आहे.

पोलीस या सायकल चोऱ्यामुळे हैराण झाले आहेत. काही पोलीस या भागातून बदली मागू लागले आहेत तर काही पोलिसांनी नोकरीला रामराम ठोकला आहे. दुसऱ्या विभागातील पोलीस येथे येण्यास तयार नाहीत. पोलिसांना या सायकल चोऱ्या बाबत काही स्पष्टीकरण देता येत नाहीये तसेच चोरीला गेलेल्या सायकली शोधणे सुद्धा शक्य होत नाही. यामुळे आता नागरिकांनी पुढाकार घेतला असून फेसबुक ग्रुप बनविले आहेत. शहरातील सुमारे ४ टक्के लोकसंख्या यात सामील झाली आहे. अनेकांनी सायकलींना जीपीएस ट्रॅकर बसविले आहेत.

शहराच्या माजी महापौर जुली विलियम्स बेट्टी या सायकल कंपनी चालवितात. त्या सांगतात रोज सायकल चोरीला गेल्याचे किमान ५-६ फोन येतात. या शहरात ३० वर्षात कधी गोळीबार झाला नाही पण सायकल चोऱ्या वाढल्याने गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे अलीकडेच गोळीबाराच्या २५ घटना घडल्या असून त्यात ४ मृत्यू झाले आहेत. अवैध ड्रग मार्केट मध्ये चोरून जाता यावे यासाठी सायकल चोऱ्या होत असाव्यात असा एक कयास आहे. कारण चोरीला गेलेल्या बऱ्याच सायकली या बाजारात सापडल्या आहेत.