गौरी खान ई कॉमर्सवर- टाटा क्लिकशी पार्टनरशिप

बॉलीवूड किंग शाहरुख खान याची पत्नी गौरी खान गेली ९ वर्षे स्वतःचा लग्झरी लाईफस्टाईल प्लॅटफॉर्म गौरी खान डिझाईनस यशस्वीपणे चालवत आहे. आता तिने ई कॉमर्स क्षेत्रात पदार्पण केले असून टाटा ग्रुपची कंपनी टाटा क्लिक बरोबर पार्टनरशिप केली आहे. फिल्म निर्माती, फॅशन डिझायनर व इंटिरीअर डिझायनर म्हणून गौरी खान अगोदरच प्रसिद्ध आहे. अनेक नामवंतांच्या वास्तू गौरी खान ने सजवून दिल्या आहेत. त्यात बॉलीवूड कलाकाराची संख्या मोठी आहे.

टाटा क्लिक, गौरी खानने डिझाईन केलेले सॉफ्ट फर्निशिंग, अॅक्सेसरिजची मोठी यादी त्यांच्या स्टोर मधून उपलब्ध करून देणार आहे. त्यात कुशन, बेड कव्हर्स, विविध प्रकारचे ट्रेज, ग्लासवेअर, चीज पनीर प्लॅटर्स, आर्टवर्क, कोस्टर्स, छोट्या मूर्ती, मेणबत्ती स्टँडस, टेबल लँप साईड टेबल अश्या अनेक वस्तू आहेत. गौरी खान या नव्या प्लॅटफॉर्म मुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांच्या पर्यंत पोहोचू शकणार आहे.

टाटा क्लिक लग्झरी ब्रांड प्रमुख गीतांजली सक्सेना या संदर्भात म्हणाल्या, गौरी खान यांनी या क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या रचना उत्कृष्ट आणि सौदर्यशास्त्रानुसार असतात. टाटा क्लिक लग्झरी तसेच स्थानिक श्रेणीचा विस्तार करत आहे आणि या क्षेत्रात अधिक मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत आहे. अश्या वेळी गौरी खान यांच्या ब्रांड बरोबर झालेली भागीदारी उपयुक्त ठरणार आहे. गौरी खान यांनी त्यांच्या लग्झरी लाईफस्टाईल प्लॅटफॉर्मची सुरवात २०१३ मध्ये केली होती. त्यामागे प्रत्येक इंटिरीअर साठी वन स्टॉप डेस्टीनेशन असा उद्देश आहे.