अबब! या व्यक्तीला लागली तब्बल १६ हजार कोटींची लॉटरी

सुमारे दहा तासांच्या उशिरानंतर जाहीर केल्या गेलेल्या पॉवरबॉल जॅकपॉट लॉटरीवर अखेर कॅलिफोर्निया मधील व्यक्तीने दावा केला आहे. या व्यक्तीने २.०४ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे १६ हजार कोटीची लॉटरी जिंकली आहे.

लॉटरी जिंकायला नशिबाची साथ लागते. जो लॉटरी जिंकतो त्याचे नशीब रातोरात बदलते. जगभरात सर्वच देशात मोठ्या प्रमाणावर लॉटरी खेळली जाते. काही लोकांना तर लॉटरीचे व्यसन असते. बरेच लोक भाग्याची परीक्षा पाहण्याच्या नादात भिकेला लागून रंक बनतात तर काही थोडे भाग्यवान राजे बनतात. मोठ्या रकमेची लॉटरी जिंकणे हा बातमीचा विषय होतो. अमेरिकेतील पॉवरबॉल जॅकपॉट लॉटरी म्हणूनच चर्चेत आली आहे.

लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले गेले आहे. या लॉटरी मध्ये सफेद बॉल साठी १०,३३,४१,४७,५६ असे लकी नंबर होते तर लाल बॉल साठी १० लकी नंबर होता. या १६ हजार कोटी रकमेत दुबई मधील बुर्ज खलिफा किंवा विंडसर महाल खरेदी करणे शक्य होणार आहे. विजेता बक्षिसाची रक्कम दोन प्रकारे घेऊ शकणार आहे. त्याने सर्व रक्कम एकाच वेळी क्लेम केली तर त्याला ८ हजार कोटी रुपये मिळतील. पण २ भागात रक्कम घेतली तर त्याला १६ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. अर्थात त्यासाठी त्याला २९ वर्षे प्रतीक्षा करावी लागेल असे समजते.

मंगळवारी ही लॉटरी काढली गेली. गेले तीन महिने या लॉटरी मध्ये सलग ४० ड्रो काढूनही कुणालाच बक्षीस मिळाले नव्हते त्यामुळे जॅकपॉटची रक्कम वाढली होती.