झुकेरबर्गच्या मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

फेसबुकची मूळ कंपनी मेटाने १३ टक्के कर्मचारी कपात घोषणा केली असून त्यामुळे ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार आहे. ही कर्मचारी कपात फक्त मेटा मध्येच नाही तर फेसबुक, इन्स्टा, व्हॉटस अप व अन्य सेवा काम करणाऱ्यासाठी लागू आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरची मालकी हाती येताच एलोन मस्क यांनी ट्विटर मध्ये ५० टक्के कर्मचारी कपात केली आहे. त्या पाठोपाठ मेटाचा हा निर्णय आल्याने या क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मार्क झुकेरबर्ग यांनी या संदर्भात घोषणा करताना कंपनीचे खर्च कमी करण्याची अत्यंत गरज असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले आहे. कंपनीची या परिस्थितीत येण्याची जबाबदारी मार्क यांनी स्वीकारली आहे. मार्क म्हणाला, ही परिस्थिती येण्यासाठी आर्थिक वातावरण जबाबदार आहे. मंदी, वाढलेली स्पर्धा, जाहिराती कमी होण्याचे प्रमाण यामुळे महसूल घटला आहे. सर्व कमर्चार्यांना कंपनी तर्फे एक मेल लवकरच पाठविली जाणार असल्याचे समजते.

ज्या लोकांना कामावरून कमी केले गेले आहे त्यांना चार महिन्यांचा पगार दिला जाणार आहे. शिवाय जितके वर्षे त्यांची नोकरी आहे त्या प्रमाणे प्रत्येक वर्षाला पंधरा दिवसांच्या पगार दिला जाणार आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला सहा महिने स्वास्थ्य देखभाल खर्च दिला जाणार आहे. आता कंपनी संचलनात काही बदल केले जाणार असल्याचे संकेत दिले गेले आहेत.

विशेष म्हणजे ट्विटर आणि मेटाच नव्हे तर स्ट्राईप, सेल्सफोर्स, लिफ्ट, स्पॉटीफाय, पेलोटन, नेटफ्लिक्स, रोबिनहूड, इन्स्टाकार्ट, बुकिंग डॉट कॉम, झिलो, लुम, बियॉंड मी अश्या अन्य कंपन्यात सुद्धा कर्मचारी कपात केली जात असल्याचे वृत्त आहे. क्रंच बेसच्या रिपोर्ट नुसार अमेरिकेतील कंपन्यातील किमान ५२ हजार टेक्निकल एक्स्पर्ट बेकार होतील असा अंदाज वर्तविला गेला होता. मात्र आता हे प्रमाण ६३ हजारावर जाईल असे संकेत मिळत आहेत.