वॉशिंग्टन: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना फोन करून युक्रेन युद्ध, दहशतवादाविरुद्धची लढाई आणि इतर प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. जयशंकर यांनी ब्लिंकन यांचे दहशतवादाविरुद्धच्या “मजबूत आणि स्पष्ट संदेश” तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना उचित शासन व्हावे यासाठी केलेल्या आवाहनाबद्दल त्यांचे आभार मानले.
भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची महत्वपूर्ण चर्चा
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दोन्ही नेत्यांमधील चर्चेबद्दल माहिती दिली. ब्लिंकन आणि जयशंकर यांनी दहशतवादविरोधी सहकार्य आणि युक्रेनविरुद्ध रशियाची आक्रमक भूमिका यासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. जयशंकर यांनी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याशी बोलून आनंद झाला. दहशतवाद आणि 26/11 च्या उत्तरदायित्वावर त्यांनी दिलेल्या मजबूत आणि स्पष्ट संदेशाबद्दल त्यांचे आभार मानले. युक्रेन संघर्ष आणि इतर प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली, असे ट्विट करून नमूद केले आहे.
शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या (सीटीसी) अनौपचारिक सत्राला संबोधित करताना ब्लिंकेन म्हणाले की, मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा न दिल्याने चुकीचा संदेश जाईल. मुंबई हल्ल्यातील गुन्हेगारांना, त्यांच्या सूत्रधारांना योग्य शिक्षा मिळावी ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे ब्लिंकन यांनी नमूद केले.
