अमेरिकन संशोधकांनी जन्माला घातला करोनाचा अतिघातक स्ट्रेन

अमेरिकेच्या बोस्टन येथील वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत करोनाचा नवा स्ट्रेन जन्माला घातला असून त्याचा मृत्युदर ८० टक्के इतका आहे. फॉक्स न्यूजच्या बातमीनुसार याच प्रकारे सर्वप्रथम चीनी प्रयोगशाळेत करोना जन्माला आला होता आणि त्याने जगभरात अत्यंत घातक महामारीची सुरवात केली होती.

फ्लोरिडा आणि बोस्टन येथील संशोधकांच्या एका गटाने  विद्यापिठाच्या प्रयोगशाळेत हे संशोधन केले असून त्यावर अनेक मान्यवरांनी टीकेची झोड उठविली आहे. या नव्या स्ट्रेनचा वापर करण्यात आलेल्या उन्दरांपैकी ८० टक्के उंदीर मरण पावले आहेत. संशोधकांचे हे संशोधन म्हणजे विस्तवाशी खेळ असल्याचे म्हटले जात आहे.

हा स्ट्रेन ओमिक्रोन व वूहान प्रयोगशाळेतून बाहेर पडलेल्या मूळ करोना विषाणूचे कॉम्बीनेशन आहे. ओमिक्रोनच्या स्पाईक प्रोटीनचा या स्ट्रेनशी संयोग केला गेला आहे. या स्ट्रेनने संक्रमित झालेले उंदीर कश्या प्रतिक्रिया देतात हे पाहिले गेले. याला हायब्रीड स्ट्रेन असे म्हटले गेले असून तो ओमिक्रोनच्या तुलनेत पाच पट अधिक संक्रामक आहे. हा प्रयोग अमेरिकेच्या १३ जीव सुरक्षा स्तरावरील चार प्रयोगशाळेतील एका प्रयोगशाळेत केला गेला. येथे करोना आणि इबोला अश्या घातक विषाणूवर संशोधन केले जाते.