धनत्रयोदशीला चांदी नाणी घेताय? बनावट नाण्यांचा बाजारात सुळसुळाट

दिवाळी आता अगदी तोंडावर आली आहे. दिवाळी मध्ये धनत्रयोदशीला चांदी, सोने किंवा धातूची भांडी खरेदी करण्याची परंपरा अनेक हिंदू कुटुंबात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा लक्ष्मी गणेश प्रतिमेची चांदीची नाणी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात. मात्र या वर्षात चांदीची बनावट नाणी मोठ्या प्रमाणावर बाजारात आली आहेत. प्रामुख्याने राजस्थानच्या जयपूर सारख्या मोठ्या शहरातून अशी नाणी अन्य शहरात पाठविली जात आहेत.

ही नाणी जर्मन सिल्व्हर पासून बनविली गेली असून त्यावर चांदीचे कोटिंग केले गेले आहे. शुद्धतेची खात्री देणारे प्रमाणपत्र या नाण्यांसोबत दिले जात आहे. एक किलो बनावट नाणी बनविण्यासाठी येणारा खर्च ८०० ते ९०० रुपये आहे मात्र शुद्ध नाणी म्हणून हा माल ५५ ते ५७ हजार रुपये किलोने विकला जात आहे. जर्मन सिल्व्हर तांबे, निकेल आणि जस्त धातुंच्या मिश्रणातून बनते आणि दिसायला ते अगदी चांदी सारखे दिसते. काही ठिकाणी चांदीचे प्रमाण ६५ ते ७० टक्के असलेली नाणी सुद्धा १०० टक्के चांदीची म्हणून विकली जात आहेत आणि त्यावर मेकिंग चार्ज म्हणजे मजुरी वेगळी आकारली जात आहे.

फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी खरेदी करताना थोडी काळजी घेतली तर अशी फसवणूक टाळता येते. नाण्याला चुंबक लावल्यास खरी चांदी त्याला चिकटत नाही मात्र बनावट नाणे त्याकडे ओढले जाते. बर्फाच्या तुकड्यावर नाणे ठेवावे. चांदी खरी असेल तर बर्फ वेगाने वितळते. दगडावर नाणे घासले आणि वेगळीच पांढरी रेघ उमटली तर चांदी खरी आहे आणि पिवळसर रेघ आली तर बनावट आहे असे ओळखता येते.