बायडेन यांच्या अगोदर ट्रम्प साजरी करणार दिवाळी

भारतात दिवाळीची चाहूल लागली असून दिवाळीची तयारी सुरु झाली आहे. भारताप्रमाणेच जगाच्या अन्य देशात सुद्धा दिवाळी धूम सुरु झाली असून त्याला महासत्ता अमेरिका सुद्धा अपवाद नाही. अमेरिकन नेते सुद्धा दिवाळी साठी तयारीला लागले असून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन त्यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे व्हाईट हाउस मध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. त्यांच्या पत्नी जिल याही या समारंभात सहभागी होणार आहेत. व्हाईट हाउस मध्ये दिवाळी २४ ऑक्टोबर रोजी साजरी होणार असून त्यात भारतीय अमेरिकन प्रशासकीय समुदायातील अधिकारी सामील होणार आहेत.

दुसरी कडे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा दिवाळीची तयारी सुरु केली आहे. ट्रम्प, बायडेन यांच्या अगोदरच दिवाळी साजरी करणार आहेत. ट्रम्प यांची दिवाळी त्यांच्या फ्लोरिडा येथील मार-ए लागो- रिसोर्टवर २१ ऑक्टोबर रोजी होत आहे. यासाठी रिपब्लिकन पार्टी हिंदू विंगतर्फे भारतीय अमेरिकन समुदायातील नेत्यांना आमंत्रित केले गेले आहे. हा कार्यक्रम चार तासांचा असून यावेळी फटाके सुद्धा उडविले जाणार आहेत असे समजते. याशिवाय अनेक अमेरिकन राज्यात डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन नेते आपापल्या पातळीवर भारतवंशीयांसह दिवाळी सेलेब्रेशन मध्ये सामील होणार आहेत.