टी २० वर्ल्ड कप, आयनॉक्स सिनेमागृहात घेता येणार सामन्याचा आनंद

भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टी २० वर्ल्ड कप मधील टीम इंडियाचे सर्व सामने आता मोठ्या स्क्रीनवर पाहता येणार आहेत. आयसीसी आणि आयनॉक्स मध्ये या संदर्भात करार झाला असून टीम इंडियाचे सर्व साखळी सामने आणि उपांत्य फेरी आणि अंतिम सामना चित्रपट गृहात बसून बघण्याचा आनंद चाहत्यांना मिळणार आहे. टीम इंडियाचा सुरवातीचा सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान बरोबर होणार आहे.

आयसीसी पुरुष टी २० वर्ल्ड कप चा हा आठवा सिझन १६ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. पहिल्या राउंड नंतर सुपर १२ चे सामने २२ ऑक्टोबर पासून होणार आहेत. अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. आयनॉक्स लेझर लिमिटेडचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद विशाल म्हणाले हे सामने देशभरातील २५ पेक्षा जास्त शहरातील आयनॉक्स मल्टीप्लेक्स मध्ये दाखविले जाणार आहेत. देशात आयनॉक्सची १६५ मल्टीप्लेक्स असून ७४ शहरात ७०५ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जातात. पूर्ण भारतात प्रेक्षक सीट संख्या १.५७ लाख इतकी आहे. भारतात क्रिकेट हा अत्यंत आवडता खेळ आहे. विशाल स्क्रीनवर या खेळाचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे.