उज्जैन येथील महाकाल लोक पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशाला समर्पित

देशातील आस्था व सांस्कृतिक चेतना केंद्रांना भव्य रूप देण्याचे अभियान पुढे चालू ठेवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथील महाकाल लोक देशाला समर्पित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चाळीस देशातील भारतवंशीयांना पाहता आले असून या प्रकल्पासाठी ८५६ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. यातील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यामुळे या क्षेत्राचा परिसर पूर्वीच्या २.८२ हेक्टर वरून २० हेक्टर झाला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी प्रथम महाकाल पूजा आणि आरती केली तेव्हा त्यांनी गळ्यात रुद्राक्ष माला आणि कपाळावर चंदन गंध लावले होते. या वेळी बोलताना मोदी म्हणाले,’ उज्जैन ही पवित्र सप्तपुरी पैकी एक असून ज्योतिर्लिंगपैकी फक्त हे एकमेव असे लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे. येथील भस्म आरती जगप्रसिद्ध आहे आणि भगवान कृष्णाने येथे शिक्षण घेतले होते अशी या क्षेत्राची महती आहे. उज्जैनच्या कणाकणात अध्यात्म भरलेले आहे. प्रतापी राजा विक्रमादित्य यांच्या मुळे या भूमीला सुवर्णकाळ प्राप्त झाला होता.

या कॉरिडोर मध्ये २०० पेक्षा अधिक मूर्ती असून मंदिराचे १०८ खांब कलाकुसर केलेले आहेत. कॉरिडोर मध्ये अतिभव्य अशी भित्ती चित्रे, कथा चित्रे रेखली गेली आहेत. अयोध्या रामजन्मभूमी, वाराणसी काशी विश्वेश्वर धाम, केदारनाथ नवनिर्माण व गुजराथ पावागड कालिका मंदिर शिखर पुनर्निर्माण व ध्वजारोहण असे एका पाठोपाठ एक प्रकल्प मोदी देशाला देत आहेत. या मुळे धार्मिक पर्यटनात वाढ होऊ लागली असून त्याचा मोठा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होत आहे.