Roger Federer Farewell : कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात भावुक झाला फेडरर, नदाललाही आवरता आले नाहीत अश्रू


रॉजर फेडररने अखेर टेनिस कोर्टला निरोप दिला. शुक्रवारी लेव्हर कपमध्ये त्याचा जोडीदार राफेल नदालसोबत दुहेरीच्या सामन्यात पराभव झाला आणि यासह त्याची चमकदार कारकीर्दही संपुष्टात आली. या शेवटच्या सामन्यानंतर रॉजर फेडररला आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो ढसाढसा रडताना दिसला. या भावनिक क्षणात राफेल नदालही त्याच्यासोबत अश्रू ढाळताना दिसला.


रॉजर फेडरर हा तिसरा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू आहे. गेल्या आठवड्यात त्याने टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. दुखापतीमुळे तो बराच वेळ टेनिस कोर्टच्या बाहेर होता. अशा स्थितीत त्याने लेव्हर कपमध्ये कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्याची घोषणा केली होती.


लेव्हर कपमध्ये तो टीम युरोपसाठी मैदानात उतरला होता. त्याचा जोडीदार स्पॅनिश दिग्गज राफेल नदाल होता. या जोडीने टीम वर्ल्ड जोडी फ्रान्सिस टिफॉय-जॅक सॉकचा पहिल्या सेटमध्ये पराभव केला, पण पुढचे दोन सेट रोमहर्षक पद्धतीने गमावले. यासह फेडरर-नदाल जोडीच्या हातून सामनाही निसटला. पराभवानंतर फेडरर कोर्टवरच रडायला लागला.


लंडनच्या ब्लॅक कोर्टमध्ये फेडररला पाहण्यासाठी सर्व जागा भरल्या होत्या. नदाल आणि फेडरर कोर्टवर पोहोचताच चाहत्यांनी उभे राहून फेडररला सलामी दिली. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघ आणि टेनिस कोर्टवर उपस्थित असलेले चाहते फेडररच्या प्रत्येक शॉटचे कौतुक करताना दिसले.


सामना संपल्यानंतर टीम वर्ल्ड आणि टीम युरोपच्या खेळाडूंनी फेडररला खांद्यावर उचलून हवेत फेकले. लेव्हर कप आणि एटीपीच्या ट्विटर हँडलवरून फेडररच्या या शेवटच्या सामन्याशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.