भारत बायोटेकच्या, नाकातून देण्याच्या करोना लस चाचण्या यशस्वी

भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने तयार केलेल्या नाकावाटे देण्याच्या करोना लस चाचण्या पूर्ण आणि अतिशय यशस्वी झाल्याचे म्हटले असून सरकार लवकरच या नेसल व्हॅक्सीनला परवानगी देईल असे म्हटले आहे. सरकारी परवानगी मिळाली की बुस्टर डोस इंजेक्शन ऐवजी नाकातूनचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. या लसीच्या बुस्टर डोस चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नेसल व्हॅक्सीनचे पहिले दोन डोस आणि बुस्टर डोस यांच्या वेगवेगळ्या चाचण्यांचे तीन फेरे पूर्ण झाले असून त्यात ही लस सुरक्षित आणि सहन करता येणारी आणि चांगली प्रतिरक्षा देणारी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्यांचे करोना लसीचे दोन डोस घेतले गेले आहेत त्यांना तिसरा बुस्टर डोस नाकावाटे घेता येणार आहे. बीबीवी १५४ कोविड १९ नाकातून देता येणाऱ्या लसीची निर्मिती स्पाईक प्रोटीन तंत्रानुसार केली गेली आहे. या लसीच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील चाचण्या सुद्धा सुरक्षित आणि यशस्वी झाल्या आहेत.

कोवॅक्सीनच्या तुलनेत ३१०० बाबीत ही लस प्रतिरक्षा देणारी असून या लसीच्या चाचण्या देशात विविध १४ ठिकाणी घेतल्या गेल्याचे समजते. ही लस कनिष्ट आणि मध्यम आर्थिक क्षमतेच्या देशांना सहज परवडणारऱ्या  किमतीत उपलब्ध असून बीबीव्ही १५४ ची निर्मिती सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विश्वविद्यालयाच्या सहकार्याने केली गेली आहे. स्वातंत्रदिनादिवशी या लसीच्या चाचण्या अतिशय यशस्वी ठरल्याचे जाहीर केले गेले आहे.