काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप: हॉटेलमधील महिलेसोबतचा व्हिडिओ भाजप नेत्याने केला शेअर, नाना पटोले म्हणाले- चारित्र्यहीनतेच्या आरोपावर करणार कायदेशीर कारवाई


मुंबई – महाराष्ट्रातील भाजपच्या मोठ्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. छायाचित्रांसह तयार केलेला हा व्हिडिओ मेघालयातील चेरापुंजी येथील हॉटेल पोलो ऑर्किडचा आहे. यामध्ये एक पुरुष महिलेच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला दिसत आहे. ही व्यक्ती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांनी एका लोकप्रतिनिधीच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांना तत्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. याला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, हा माझ्यावर चारित्र्यहीनतेचा आरोप आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. आमची कायदेशीर टीम या प्रकरणी कारवाई करेल.


महिलेच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहेत नाना पटोले
भाजप नेत्याने व्हिडिओ शेअर करत ‘काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….’ असा प्रश्न विचारला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावत नाही. हा व्हिडिओ आधीच व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला नानांनी टी-शर्ट आणि पँट घातलेले फोटो आहे. त्यानंतर नाना एका महिलेच्या खांद्यावर हात ठेवून बसलेले दिसत आहेत. यानंतर एका हॉटेलचा फोटो दिसत आहे.

अनेक पटींनी वाढतात लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या : चित्रा वाघ
व्हिडिओ शेअर केल्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या, हा व्हिडिओ मिळाल्यावर मला धक्काच बसला. मी तो पुन्हा तपासला आणि तो व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाल्याचे आढळले. सोलापूर असो, रायगड असो, नाना पटोले असोत वा कोणताही पक्ष, लोकप्रतिनिधी असताना तुमच्या जबाबदाऱ्या अनेक पटींनी वाढतात. प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. लोकप्रतिनिधींकडून जनतेने काय शिकले? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी कमालीची खालावली : नाना पटोले
मात्र, या व्हिडिओबाबत त्यांना विचारले असता, हा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचेही नाना पटोले म्हणाले. मुंबईला रवाना होत असताना नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूपच खालावली आहे. माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. आमची कायदेशीर टीम याचा तपास करत आहे. गरज पडल्यास न्यायालयात जाण्याचीही आमची तयारी आहे.

मोदींवर टीका केल्यानंतर भाजपच्या निशाण्यावर आहेत नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही जोरदार शब्दांत टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले होते. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापू शकते.