कोहली इंस्टाग्रामवर अजूनही हिट : आशियातील सर्वाधिक कमाई करणारा स्पोर्ट्स सेलिब्रिटी ठरला, प्रत्येक पोस्टमधून कमावतो 8 कोटी रुपये


टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली बॅटने फ्लॉप ठरत आहे. गेल्या तीन वर्षांत त्याच्या बॅटने कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेले नाही, पण सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून त्याचा दबदबा कायम आहे. 33 वर्षीय कोहली प्रत्येक इन्स्टा पोस्टमधून 8 कोटी रुपये कमावतो. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टसह तो आशियातील नंबर 1 स्पोर्ट्स सेलिब्रिटी बनला आहे.

फक्त पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी त्याच्यापेक्षा जास्त कमावतात. hopperhq.com ने नुकतीच त्यांची 2022 श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली, ज्यामध्ये कोहली 14 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर प्रियांका चोप्रा 27 व्या स्थानावर कायम आहे.

रिचलिस्टमध्ये 14 व्या क्रमांकावर, आशियाखंडात अव्वल
या सोशल प्लॅटफॉर्मच्या श्रीमंतांच्या यादीत विराट 14 व्या क्रमांकावर आहे. टॉप-15 मध्ये तो एकमेव भारतीय आहे. त्याच्याशिवाय प्रियांका चोप्राला 27 वे स्थान मिळाले आहे. प्रियांका प्रत्येक पोस्टच्या माध्यमातून 3 कोटी रुपये कमावते. सर्वाधिक मानधन घेणारा सेलिब्रिटी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. प्रत्येक पेड पोस्टमधून तो 19 कोटी रुपये कमावतो. त्याला पहिले स्थान मिळाले आहे, तर लिओनेल मेस्सी पेड पोस्टमधून 14 कोटी रुपये कमावतो.

कोहलीचे आहेत 20 कोटी फॉलोअर्स
विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 20 कोटी फॉलोअर्स आहेत. इतके फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटर आहे. या प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले तर, पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव जगभरातील खेळाडूंमध्ये अग्रस्थानी येते. त्याचे 442 दशलक्ष (40.40 कोटी) फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोपाठोपाठ अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी आहे. त्याला 327 दशलक्ष (32 कोटी) चाहते फॉलो करतात.

इंग्लंड दौऱ्यावर कोहलीला करता आल्या केवळ 76 धावा
विराट कोहली गेल्या तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर तो संघर्ष करताना दिसला. इंग्लंड दौऱ्यात विराटला एक कसोटी, 2 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 2 एकदिवसीय सामन्यांच्या 6 डावात केवळ 76 धावा करता आल्या. विराटने अनुक्रमे 11, 20, 1,11, 16 आणि 17 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही तो विशेष काही करू शकला नाही. गेल्या मोसमात कोहलीने 16 डावांत केवळ 294 धावा केल्या होत्या. दरम्यान विराटने गेल्या तीन वर्षांपासून बॅटने शतक झळकावलेले नाही. गेल्या 12 डावात त्याने 227 धावा केल्या आहेत.