पाणी खाल्ले पाहिजे


आपण आपल्या भाषेमध्ये पाणी पिणे असा शब्द वापरतो. परंतु आयुर्वेदाने मात्र पाणी खायला सांगितले आहे. असे म्हटल्याबरोबर अनेकांच्या मनात प्रश्‍न निर्माण होईल की पाणी हे द्रव असल्यामुळे ते खाता कसे येईल? यावर आयुर्वेदाचे उत्तर आहे पाणी खाणे म्हणजे छोटे छोटे घोट घेऊन चाखत चाखत पिणे. तसे का करावे याचे उत्तर आहे आपल्या तोंडामध्ये सतत लाळ स्रवत असते. लाळ हा पाचक रस असतो आणि तो निसर्गतःच अल्कलीयन असतो. सावकाश पाणी पिल्याने लाळेत पाणी मिसळले जाते आणि हे लाळयुक्त पाणी पचनसंस्थेत जाण्याने अन्नाचे पचन चांगले होते. ढसाढसा पाणी पिल्याने पचनसंस्थेवरसुध्दा ताण येत असतो. पण चाखत पाणी पिल्याने हा ताण येणे टळते.

दिवसभर आपण जेवढे पाणी पितो ते पाणी शरीरातल्या आतील भागात सम प्रमाणात विखुरले गेले तर भूकसुध्दा कमी लागते आणि अन्नाचे अती सेवन टळून पचनसंस्था सुधारते. कधी कधी आपल्याला तहानेने किंवा भुकेने अस्वस्थपणा येतो. अशावेळी आपल्याला नेमकी तहान लागली आहे की भूक लागली आहे हे समजत नाही. अशावेळी सावकाशीने पाणी प्यावे. त्याच्याने अस्वस्थपणा कमी झाला तर जेवण करण्याची गरज पडत नाही. पाणी थंड प्यावे की सामान्य तापमानाचे प्यावे असाही प्रश्‍न सतावतो. परंतु आयुर्वेदाने फ्रिजमधले अती थंड पाणी किंवा अती थंड रस हे वर्ज्य ठरवले आहेत. जेवणाबरोबर अतीथंड पाणी पिणे हे तर आयुर्वेदानुसार विषच असते.

जेवणाच्या आधी पाणी पिऊन लगेच जेवू नये. पाणी पिल्यानंतर अर्ध्या तासाने जेवावे आणि जेवताना पाणी न पिता जेवणानंतर अर्ध्यातासाने ते प्यावे. आयुर्वेदाने असे सांगितले आहे की पोटाचा पन्नास टक्के भाग अन्नाने भरावा. उर्वरित २५ टक्के भाग पाण्याने भरावा आणि शेवटचा २५ टक्के भाग हवेसाठी मोकळा सोडावा. त्यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया व्यवस्थित चालू शकते. सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी प्यावे. स्नानापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे. झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे. उभ्याने पाणी पिऊ नये. उभ्याने पाणी पिल्यास पिलेले पाणी सरळ पचन संस्थेच्या शेवटच्या भागापर्यंत जाते आणि त्यामुळे पुढे चालून गुडघ्याचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. उभ्याने ढसाढसा पाणी पिल्याने किडनीचेसुध्दा विकार उद्भवण्याची भीती असते. पाणी शरीरासाठी आवश्यक आहे पण ते पिण्याचे काही नियम आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment