केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवल्याप्रकरणी अभिनेते कमल हासन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


चेन्नई – सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीला कमल हासन हे नाव नवीन राहिलेले नाही. त्यांच्या नावाचा दबदबा केवळ कलाविश्वच नाही, तर राजकीय वर्तुळातही असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील ते तितकेच लोकप्रिय आहेत. ‘सदमा’, ‘एक दुजे के लिए’, ‘सनम तेरी कसम’, ‘सागर’, ‘हिंदुस्तानी’, ’चाची 420′ असे अनेक सुपरहिट चित्रपट अभिनेते कमल हासन दिले आहेत. आपल्या प्रयोगशील अभिनयाने त्यांनी एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. कमल हासन यांचा विक्रम हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. पण या चित्रपटातील एका गाण्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

येत्या ३ जूनला कमल हासन यांचा बहुचर्चित विक्रम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले होते. पत्थला पत्थाला असे या गाण्याचे नाव आहे. कमल हासन यांनी हे गाणे लिहिले असून अनिरुद्ध रविचंदर यांनी ते संगीतबद्ध केले आहे. पण याच गाण्यामुळे कमल हासन अडचणीत सापडले आहेत. पत्थला पत्थाला गाण्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादग्रस्त असे विक्रम या चित्रपटातील पत्थला पत्थाला या गाण्याचे बोल असल्यामुळे यातून केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवली जात आहे. तसेच यामुळे लोकांमध्ये फूटही निर्माण होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सेल्वम यांनी केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या टीमने गाण्याच्या लिरिक्समध्ये बदल करुन ते काढून टाकावे, अशी विनंती त्या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे.

चेन्नई येथील पोलीस आयुक्त कार्यालयात या प्रकरणी कमल हासन यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सेल्वम यांनी केलेल्या पोलीस तक्रारीवर काहीही कारवाई न झाल्यास त्यांनी ‘विक्रम’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही घेतला आहे. सध्या हे गाणे टॉप ट्रेंडीगमध्ये पाहायला मिळत आहेत. या गाण्याला 770 हून अधिक लाइक्स आणि 14 लाख व्ह्यूजही मिळाले आहेत. त्यामुळे कमल हासन या चित्रपटातील ते गाणे काढणार का? का गाण्याच्या बोलामध्ये बदल करणार ? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत.