अभिनेत्री केतकी चितळेला शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट पडली महागात!, पोलिसांनी घेतले ताब्यात


मुंबई – छोट्यापडद्यावरील मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अडचणी वाढताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळे विरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने नवी मुंबई येथून केतकी चितळे हिला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक केल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमधून त्यांनी केतकी चितळेला अटक केल्याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

केतकी चितळे विरोधात ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते स्वप्नील नेटके यांनी दिली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत केतकी चितळे विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. केतकी चितळेने शरद पवारांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून केतळी चितळेचा निषेध केला आहे.