राजधानी दिल्लीत इमारतीला भीषण आग; 26 जणांचा होरपळून मृत्यू, तर अनेक जखमी


नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळच्या एका इमारतीला शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 12 हून अधिकजण जखमी झाले. दरम्यान दिल्ली अग्निशमन विभागाने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली.

सुमारे 70 जणांची आगीने वेढलेल्या या इमारतीतून सुटका करण्यात आली असली, तरी आणखी काही जण अडकल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. ही आग भीषण असून आतापर्यंत, आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून 26 मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेह ओळखण्यापलिकडे असल्याचे दिल्ली अग्निशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले.

दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 4.40 च्या सुमारास मुंडका स्थानकाजवळच्या या व्यावसायिक संकुलाच्या तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि राऊटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे, त्याठिकाणी प्रथम आगीचा भडका उडाला. त्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर पसरली. आग विझवण्यासाठी 27 बंब प्रयत्नांची शर्थ करत होते, अशी माहिती दिल्ली अग्निशमन सेवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आगीत 20 जणांचा होरपळून किंवा गुदमरून मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त समीर शर्मा यांनी दिली.