पोस्टर रिलीज : रोहित शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’मध्ये हिंदीसह मराठी कलाकारांचीही मांदियाळी


सिनेरसिकांसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टीचे चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा डबल डोस असतो. त्याच्या चित्रपटांमध्ये अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स सारे काही एकत्र पाहायला मिळते. त्याचा शेवटचा ‘सुर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. रोहितने आता त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या बिग बजेट चित्रपटामध्ये हिंदीसह मराठी अभिनेत्यांच्या नावाचीही वर्णी लागली आहे. रोहितचा हा नवा प्रोजेक्ट म्हणजे मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे.

‘सर्कस’ (Cirkus) या आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये आणण्याची हिच ती वेळ आहे. ‘सर्कस’ चित्रपट म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ख्रिसमस गिफ्ट आहे. कारण या सर्कसमध्ये खूप गोलमाल असल्याचे या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना रोहितने म्हटले आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटामध्ये देखील मनोरंजनाचा डबल डोस प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.


चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये कलाकार विविध भूमिकेमध्ये दिसत आहेत. तसेच रणवीर सिंगचा यामध्ये डबर रोल असल्याचे दिसत आहे. एक भूमिका अगदी साधी तर दुसरी भूमिका एकदम बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच अभिनेता वरुण शर्माचा देखील या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये इतर कलाकार रेट्रो लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटामध्ये हिंदीमधील टॉपच्या अभिनेत्री देखील काम करताना दिसणार आहेत.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत जॅकलिन फर्नांडिस, पुजा हेगडे काम करताना दिसतील. त्याचबरोबरीने सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले या मराठी कलाकारांच्या ही या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या पोस्टरला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. येत्या २३ डिसेंबरला म्हणजे ऐन ख्रिसमसच्या मोक्यावर चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.