राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणाऱ्या भाजप खासदाराच्या टीकेवर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया


मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना अयोध्येत घुसू देणार नसल्याचा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आधीच दिला आहे. तसेच राज ठाकरे हे दबंग नसून उंदीर असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेच्या प्रवक्त्यांची राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली. बाळा नांदगावकर या बैठकीनंतर बोलताना म्हणाले की, आज संघटनात्मक दृष्टीने अत्यंत महत्वाची बैठक झाली. सर्व प्रवक्ते आणि नेत्यांना बोलावण्यात आले होते. महाराष्ट्रात झालेल्या तीन सभा आणि त्यानंतर राज्यातील ढवळून निघालेले वातावरण, त्याचबरोबर अयोध्या दौऱ्यावर चर्चा झाली. एक बैठक पुन्हा होईल.

भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून होणारा विरोध आणि दिलेल्या जाहीर आव्हानासंबंधी विचारले असता नांदगावकर म्हणाले की, त्यांची भूमिका ठाम असली, तरी राज ठाकरेंनी दौरा जाहीर केला आहे. त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर ते बोलतील. राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली जात असल्याचे विचारले असता त्यांनी सांगितले की, ब्रिजभूषण शरण सिंह आपली भावना व्यक्त करत आहेत. त्यावर पक्षप्रमुख बोलतील. एका खासदाराने मांडलेले मत हे उत्तर प्रदेशचे असू शकत नाही. आमच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे.

पक्षावर टोकाची टीका होत असताना मनसेकडून मौन बाळगले जात असल्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, विरोध करायचा की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते, पण वेळ काळ पहिली पाहिजे. टोकाच्या भाषेमुळे कोणाचा फायदा, तोटा होणार याचाही विचार करावा लागतो. त्यांनी गाय मारली म्हणून मी वासरु मारणार असे होत नाही, सर्वांचा विचार करावा लागतो.

समज द्यावी की नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, आता सगळे लोक जागे झाले आहेत. सगळे हनुमान चालीसा म्हणू लागले आहेत. भगवा झेंडा फिरवू लागले आहेत. सगळे आयोध्येला जायला निघाले आहेत. नाना पटोले, आदित्य ठाकरे निघाले आहेत. राज ठाकरेंच्या सभेनंतर सर्वांना दर्शनाची उत्सुकता लागली आहे, याचा आम्हाला आनंद असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या बॅनरबाजीवर टीका करताना ते म्हणाले की, कोण खरे कोण आणि खोटे कोण हे लोकांना कळते. हिंदुत्वाचा खरा वारसदार कोण हेदेखील लोकांना माहिती आहे. शिवसेनेकडे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यावाचून पर्याय नाही. त्यांच्याच नाव सर्व सुरु आहे. राज ठाकरेंनी स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. यश, अपयश काय येत असते. स्थान निर्माण केले आहे, हे नाकारुन चालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तर भारतीयांसाठी मुंबईत कार्यालय उघडले जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय असल्याचे उत्तर दिल्यामुळे मुंबईत उत्तर भारतीयांसाठी कार्यालय उघडत असेल, तर काही हरकत नसल्याचेही ते म्हणाले.