कोणत्याही क्षणी होऊ शकते मनसे प्रमुख राज ठाकरेंना अटक! परळी न्यायालयाने दुसऱ्यांदा जारी केले अजामीनपात्र वॉरंट


मुंबई – बीडमधील परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने यापूर्वी 10 फेब्रुवारीला राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. वॉरंट मिळाल्यानंतरही राज ठाकरे न्यायालयामध्ये गैरहजर राहिल्यामुळे हा आदेश न्यायालयाने दिला आहे. 13 एप्रिलपर्यंत राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, न्यायालयात राज ठाकरे हजर न झाल्यामुळे दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

यापूर्वीही जारी करण्यात आले होते अजामीनपात्र वॉरंट
राज ठाकरेंविरोधात हे दुसरे अजामीनपात्र वॉरंट असून सांगली न्यायालयानेही याआधी राज ठाकरे यांना वॉरंट बजावले होते. हे वॉरंट 2008 मधील एका प्रकरणात जारी करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्यावर आयपीसीच्या कलम 143, 109,117 आणि बॉम्बे पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोणत्याही क्षणी होऊ शकते राज ठाकरेंना अटक!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 6 एप्रिल रोजी हे वॉरंट सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जारी केले होते. त्यानुसार मनसे प्रमुखांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले होते. त्याचबरोबर न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी 8 जूनपूर्वी वॉरंटची अंमलबजावणी करून राज ठाकरे आणि मनसेच्या आणखी एका नेत्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.

जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?
दरम्यान, मुंबईमध्ये राज ठाकरे यांना ऑक्‍टोबर २००८ साली अटक करण्यात आली होती, राज्यभरात या अटकेनंतर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी तोडफोड आणि दगडफेक केली होती. अशा काही घटना बीडमधील परळीतही घडल्या होत्या. राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी परळी पोलिसांनीसुद्धा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला होता. पण राज ठाकरे या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.