आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही; धमकी देणाऱ्या भाजप खासदाराला मनसेचे उत्तर


मुंबई – मागील काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देशासह राज्याभरात चर्चा होताना दिसत आहे. त्यांनी सोशल मीडियापासून राजकीय पक्षांचे लक्ष आपल्या आक्रमक भाषण शैलीमुळे वेधून घेतले आहे. हिंदुत्वाच्या वाटेवर मनसेची वाटचाल सुरु केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी मशिदीवर असलेल्या लाऊडस्पीकरचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. असे असताना आता अयोध्या दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाणार असल्यामुळे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची लक्ष लागून आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागण्याची अट ठेवली आहे. तसेच माफी न मागितल्यास त्यांना अयोद्धेत घुसू देणार नाही, अशी धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीला आता मनसेने उत्तर दिले आहे.

धमकी कुणी दिली याला काही महत्त्व आहे की नाही? अशा धमक्यांना मनसे, मनसैनिक आणि स्वत: राज ठाकरे भीक घालत नाहीत. राज ठाकरेंबद्दल बोललो की प्रसिद्धी मिळते. ती प्रसिद्धी त्यांना मिळाली आहे. पण हे झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन त्यांना गेलेला आहे आणि शांत बसण्यास सांगितले असल्याचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी सांगितले आहे.

भाजप खासदाराने काय दिली होती धमकी
कैसरगंज येथील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी राज ठाकरेंवर सलग ट्विट करून हल्ला केला आणि ते उत्तर भारतीयांचा अपमान करत असल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यांनी ट्विट केले की, उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येच्या सीमेवर येऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.

ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही ठाकरेंना भेटू नका, असा सल्ला देत लिहिले, राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांनी राज ठाकरेंना भेटू नये, अशी माझी विनंती आहे. ठाकरे कुटुंबीयांची भूमिका नाकारत आहे. राम मंदिर आंदोलनाबाबत ते म्हणाले, राम मंदिर आंदोलनापासून मंदिर उभारणीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि सर्वसामान्यांची भूमिका राहिली आहे. ठाकरे कुटुंबीयांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.