भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर मेधा पाटकरांविरोधात ईडीची कारवाई


नवी दिल्ली – मागील ३६ वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) तक्रार दाखल केल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण या वृत्ताला आता मेधा पाटकर यांनी दुजोरा दिला आहे.

मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त असलेल्या नर्मदा नवनिर्माण अभियान या सेवाभावी संस्थेविरोधात गाजियाबाद भाजपचे जिल्हा सचिव संजीव झा यांच्या तक्रारीवरून ईडीने एफआयआर दाखल केली आहे. भाजपच्या नेत्याने २००५ साली आंदोलनासाठीच्या पैशांमधून मनी लॉण्ड्रींगच्या माध्यमातून राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला होता. राजकीय नेत्यांपाठोपाठ आता नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पात बुडित क्षेत्रातील तमाम आदिवासींना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या एनजीओवर ईडीने कारवाई केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण या सर्व प्रकरणासंदर्भात मेधा पाटकर यांनी पहिल्यांदाच भूमिका मांडताना, आमच्यावर झालेली कारवाई ही चुकीची असून हे आमच्या सारख्या जन आंदोलनाला व संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्याचे कट कारस्थान असल्याचे म्हटले आहे.

मागील अनेक वर्षांपासून नर्मदा नवनिर्माण अभियानाअंतर्गत तिन्ही राज्यांमध्ये नर्मदेच्या खोऱ्यात काम करत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि लोकांच्या समस्यांवर काम करणाऱ्या या अभियानाबद्दल एक खळबळजनक बातमी मागील तीन चार दिवसांपासून पसरवण्यात गेली आहे, असं म्हणत आपली बाजू मांडणाऱ्या मेधा पाटकर यांच्या स्पष्टीकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे.

जो आरोप आमच्यावर लावण्यात आला आहे, तो धादांत खोटा असल्याचे आमचे स्पष्ट मत आहे. त्यांनी असे दाखवले आहे की २० लोकांकडून एकच राशी आम्हाला एकाच दिवशी मिळाली. पण हे काही आमच्या कागदपत्रांवरुन सिद्ध होत नाही. हे आम्हाला मान्य नाही. ही राशी कुठे मिळाल्याचेही आम्हाला आढळलेले नाही, असे मेधा पाटकर यांनी पुढे बोलातना स्पष्ट केले आहे.

याबरोबरच नर्मदा नवनिर्माण अभियानासाठी जी राशी माझगाव डॉक या सार्वजनिक उद्योगाने दिली होती, त्याबद्दल शंका कुशंका उपस्थित केल्या आहेत. प्रत्यक्षात माझगाव डॉकने आम्हाला जो सहय्योग दिला, तो भूतपूर्व जिल्हाधिकारी नंदूरबार यांनी केलेल्या शिफारशीवरुन दिला. नंदूरबार जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्पांना माझगाव डॉकने अनेक प्रकारची मदत दिली असल्याचेही मेधा पाटकर यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना, त्यांनी आमच्या जीवन शाळेतील छात्रालयामधील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दोन वर्षांसाठी मदत दिली. आधी काही काळासाठी नंतर येऊन, बघून, समाधान व्यक्त करुन ती मदत अधिक काळासाठी दिली गेली. त्यामुळे आम्हाला नक्कीच सहयोग मिळाला. पण त्याचा कुठेही गैरवापर न होता त्याचे अकाऊंट्स, त्याचे ऑडिट, त्याचे रिपोर्ट सर्वकाही माझगाव डॉकला प्रस्तुत केले गेले. त्यांनी त्याचे मुल्यांकनही केले. त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये याचा उल्लेख असल्याचेही मेधा पाटकर यांनी सांगितले.

मेधा पाटकर यांनी पुढे बोलताना हे कारस्थान आंदोलन बदनाम करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. हे जे काही कारस्थान चालले आहे, ते आमच्या जन आंदोलनाला आणि संघर्ष निर्माण कार्याला बदनाम करण्यासाठी म्हणून केलेले आहे. व्यक्तीश: माझ्याविरोधात आणि आंदोलनाविरोधात अशाप्रकारची एक केस दाखल झाली होती, असे म्हणत या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही केस रद्द करत याचिका कर्त्याला दंड केला होता, असेही मेधा पाटकर म्हणाल्या.

आम्ही सध्याच्या प्रकरणामध्ये सर्व सहकार्य करु, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही यावेळेला पुढे जी काही कारवाई होईल, चौकशी झाली, तर त्यामध्ये सहय्योग देऊ, परंतू योग्य ती कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असे मेधा पाटकर यांनी म्हटले आहे.