राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचे ठिकाण ठरले! ९ तारखेला पुन्हा धडाडणार तोफ


ठाणे – शनिवारी ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आता गडकरी रंगायतन समोरील रस्त्याऐवजी ही सभा जुन्या ठाण्यातील गजानन महाराज चौकाजवळ होणार आहे. हा चौक गडकरी रंगायतनपासून हाकेच्या अंतरावर आहे. आता परवानगी मिळाल्यामुळे मनसेचे पदाधिकारी सभेच्या तयारीला लागले आहेत.

ठाणे शहरात शनिवारी राज ठाकरे यांची सभा निश्चित करण्यात आली आहे. पण त्याचदिवशी गडकरी रंगायतनमध्ये एका काव्य संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्यासह काही अतिमहत्त्वाचे व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित असणार आहे. तसेच या रस्त्यावर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तलावपाली येथे चैत्र नवरात्रौत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गडकरी रंगायतन येथे सभा घेतल्यास सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या कारणास्तव मनसेला अद्यापही गडकरी रंगायतन येथे सभेसाठी परवानगी मिळालेली नव्हती.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी मनसेने पदाधिकाऱ्यांनी गडकरी रंगायतन जवळील गजानन महाराज चौक येथील एकदिशा मार्गिकेचा पर्याय सूचविला आहे. या पर्यायास पोलिसांनी परवानगी दिलेली आहे.