रोहित पवारांचा राज ठाकरेंना जपून पावले टाकण्याचा सल्ला


मुंबई – गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. १९९९मध्ये राष्ट्रवादीची शरद पवारांनी स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. राज ठाकरे भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा यानंतर आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

रोहित पवार यांनी बाहेरुन आणलेले, आलेले नेते तसेच ज्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे आणि आधी दिला होता त्या पक्षांना आणि नेत्यांना भाजप संपवते, असा गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरेंनी भाजपजवळ जाताना जपून पावले टाकावीत, असा सल्ला रोहित पवारांनी दिला आहे.

त्यांनी मुंबईची निवडणूक समोर आल्यानंतर ज्या भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे, त्यावर अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भाजपला पोषक या भूमिका आहेत. पण मला जे कळते, त्यानुसार भाजपची जी स्टाईल आहे, त्यानुसार भाजप फक्त आपलाच विचार करते. बाहेरुन आणलेले, आलेले नेते, ज्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे आणि आधी दिला होता, त्या पक्षांना आणि नेत्यांना संपवतात. या गोष्टीचा मनसेने विचार करावा, असा सल्ला रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे.