संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून रशिया, चीन आणि पाकिस्तानला बाहेर काढण्याची मागणी


रशिया, चीन आणि पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमधून बाहेर काढा, अशी मागणी करण्यात आली आहे. काल बुधवारी ही मागणी युनायटेड नेशन्स वॉचचे कार्यकारी संचालक हिलेल न्युअर यांनी केली. आज गुरुवारी यूएनमध्ये या संदर्भात मतदान होणार आहे. यानंतर या देशांना संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये ठेवायचे की नाही याबाबत स्पष्टता येणार आहे. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशियाच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारतीय वेळेप्रमाणे आज सायंकाळी 7.30 वाजता यावर मतदान होणार आहे.

युक्रेनमध्ये रशियन सैनिकांकडून हल्ले सुरुच आहेत. युक्रेनमधील अनेक शहरे या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनवर रशियाने केलेला हल्ला आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यावर ही मागणी करण्यात आली आहे. 14व्या जिनिव्हा शिखर परिषदेसाठी प्रतिनिधींचे स्वागत करताना न्युअर म्हणाले होते की, इतिहासात ही दुसरी वेळ आहे की काही UNSC सदस्यांना परिषदेतून बाहेर काढले जाऊ शकते. यामध्येच अमेरिकेने जाहीर केले आहे की, आम्ही आणि इतर युरोपीय देश युक्रेनसाठी एकत्र काम करू.

न्युअर पुढे म्हणाले की, रशियाने छळलेल्या युक्रेनला सक्षम केले पाहिजे. रशियाला परिषदेतून मानवाधिकार आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी निलंबित करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. परिषदेतील गैर-लोकशाही देशांच्या सदस्यत्वावरही न्युअर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी दावा केला की, मानवाधिकार परिषदेतून रशियाला काढून टाकले जाण्याची खात्री आहे, कारण काहीच सदस्य त्यांच्या बाजून मतदान करतील.

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकन राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड मंगळवारी म्हणाल्या होत्या की, रशियाने मानवी हक्कांचा आदर वाढविण्याचा उद्देश असणाऱ्या परिषदेत असू नये. परिषदेतील सदस्यत्वाचा वापर करून रशिया मानवाधिकारांची काळजी घेतो, असा प्रचार करत आहे. परंतु रशियाच्या परिषदेतील सहभागामुळे या संस्थेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न निर्माण होत असून, संपूर्ण संयुक्त राष्ट्राला हानी पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटले होते.