ट्विंकलच्या द कश्मीर फाइल्सबाबत केलेल्या पोस्टमुळे ट्रोल होत आहे अक्षय कुमार


देशभरात विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई केली. त्याचबरोबर त्यानंतर प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ देखील या चित्रपटासमोर टिकू शकला नाही. अशात अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाची सोशल मीडिया पोस्ट काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. आपल्या पोस्टमध्ये तिने ‘द कश्मीर फाइल्स’ची खिल्ली उडवली होती. आता नेटकऱ्यांनी यावरून अक्षय कुमारला चांगलेच सुनावले आहे.

काही दिवसांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रात ट्विंकल खन्ना हिने लिहिलेल्या एका कॉलममध्ये याबाबत भाष्य केले होते. ट्विंकल खन्नाने यावेळी विवेक अग्निहोत्रींच्या द कश्मीर फाइल्सवर प्रतिक्रिया देताना त्याची खिल्ली उडवली. ट्विंकल खन्ना म्हणाली, सध्या अनेक चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्रींसोबत बरोबरी साधण्यासाठी विविध शहरांच्या नावावर चित्रपट बनवत आहे. तसेच या चित्रपटाची नावे रजिस्टर करण्यासाठी या निर्मांत्यांचीही धावपळही सुरु आहे.

आता मी सुद्धा ‘नेल फाइल’ नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करत असल्याचे म्हणत ट्विंकलने अप्रत्यक्षपणे द कश्मीर फाइल्सची खिल्ली उडवली. तसेच याबाबत मी माझी आई डिंपल कपाडियालाही सांगितले असल्याचेही तिने म्हटले. यावरून नेटकऱ्यांनी आता अक्षय कुमारला सुनावले आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिले, कृपया तुमच्या मूर्ख पत्नीला समजवा अक्षय कुमारजी, नाहीतर एक दिवस तिच्यामुळे तुम्ही रस्त्यावर याल. स्वतः तर फ्लॉप आहेच. काही काम नाही, तर घरी बसून ती स्वतःचा मुर्खपणा सर्वांना दाखवून तुम्हाला लवकरच रस्त्यावर आणणार आहे. तिला समजवा.

दरम्यान अक्षय कुमार देखील काही काळापूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत केलेल्या एका ट्वीटमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला होता. ‘द कश्मीर फाइल्स’वर त्याने प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून स्वतःच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी अक्षय ‘द कश्मीर फाइल्स’च्या नावाचा वापर करत असल्याचे म्हणत नेटीझन्सनी त्याच्यावर टीका केली होती.