राज ठाकरेंच्या विरोधातील भूमिका मोरेंना भोवली? पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी!


पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी काही भागात हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला. पण, या भूमिकेच्या विरोधात मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून राज ठाकरेंनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण केले असताना वसंत मोरेंना त्यातून वगळण्यात आले होते. अखेर त्यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भातील घोषणा मनसेने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!, अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरे साईनाथ बाबर यांना जबाबदारीसंदर्भातील पत्र सोपवत असल्याचा फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले होते. पण त्यांनी त्यावेळी आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचे म्हटले होते. यावेळी मी एक क्लिअर करतो की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाही. पण राजसाहेबांचे भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलेच नसल्याचे सांगितले होते. आमच्या प्रभागांमध्ये आम्ही भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचे वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितले होते.

दरम्यान, अकरा महिन्यांसाठीच मी राज ठाकरे यांच्याकडून शहराध्यक्षपद मागून घेतले होते. साईनाथ बाबर यांची निवड झाली आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. मी मात्र मनसेतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन, असे वसंत मोरे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला ही भूमिका मांडल्यानंतर मनसेच्याच काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात अालेल्या ठिकाणी त्यांचे नाव देखील खोडून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी भूमिकेला विरोध केला होता. वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर या दोघांच्या प्रभागात जवळपास ७० टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यात राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावले असताना वसंत मोरेंना टाळल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ती शक्यता आता खरी ठरली आहे.