शिर्डी – आज (६ एप्रिल) शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ निवासस्थानांच्या नूतन इमारतींचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केले. त्यांनी यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाला काही सूचनाही केल्या. तसेच अजित पवार यांनी पोलीस दलाची मान खाली जाईल, असं काम पोलिसांनी करू नये, असा सल्ला शिर्डीत बोलताना दिला.
महाराष्ट्र पोलीस दलाची मान खाली जाईल असे काम पोलिसांनी करू नये – अजित पवार
अजित पवार म्हणाले, ५३५ स्क्वेअर फुटांचे साडेसहा हजार फ्लॅट पोलिसांसाठी शासनाने राज्यात उपलब्ध करून दिले आहेत. या बांधकामांच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आली नाही. पोलीस दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्क यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व वेगाने धावणाऱ्या गाड्या या सुसज्ज साधनांसोबत स्मार्ट पोलिसिंग व ई-ऑफिसचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच पोलीस दलाची मान खाली जाईल, असे काम पोलिसा़ंनी करू नये.
सध्या देश स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने जीर्ण झालेल्या राज्यातील ७५ पोलीस ठाण्यांचे बांधकाम करण्यात येईल. तसेच राज्यात पोलिसांच्या विविध गृहनिर्माण कार्यक्रमांना ८६० कोटी उपलब्ध करून दिले आहेत. मी आज राज्याच्या गृहमंत्र्यांना असा शब्द देतो की या निधीत जूलै अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये अधिक वाढ करण्यात येईल, असेही अजित पवार या़ंनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, पोलीस दलासोबत इतर विभागांनीही गुन्हे कमी करण्यासाठी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. गुन्हे कमी झाल्यास राज्याचे उत्पन्न वाढते. जिल्हा नियोजनामधून पोलिसांना वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.
शिर्डी शहर व परिसराचा विकास करण्यासाठी शिर्डी विमानतळाचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यातून कॉर्गा टर्मिनल, नाईट लॅडींग या सुविधा सुरू करण्यात येतील. यातून कृषी मालाची वाहतूक जलदगतीने होईल. यावर्षी शिर्डी, नवी मुंबई व सिंधुदुर्ग या विमानतळांना ग्रीन फिल्ड दर्जा देण्यात आला आहे.