ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेवरुन मनसेची आक्रमक भूमिका


ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात सभा घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. परंतु त्याच दिवशी गडकरी रंगा़यतन नाट्यगृहात काव्य संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांसह इतर महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. पोलिसांना त्यासाठी सुरक्षाव्यवस्था तैनात ठेवावी लागणार आहे. शिवाय, सभेमुळे परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे पोलिसांनी सभेसाठी मुस चौकाऐवजी शहरातील दोन ठिकाणांचे पर्याय सुचविले आहेत. पण मनसेच्या स्थानिक नेत्यांना ते पर्याय मान्य नसून त्यांनी मुस चौकातच सभा घेण्याचा आग्रह धरल्याचे चित्र आहे.

गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा पुरस्कार करत मदरशांवर धाडी घाला आणि मशिदींवरील भोंगे काढा असे विधान केले होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सतत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज यांच्या ९ एप्रिलच्या नियोजित सभेच्या आयोजनाकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

राज यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागातील सभेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. सभेला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. परंतु काही कारणामुळे ही सभा दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा पर्याय मनसेला दिला आहे.

९ एप्रिलला गडकरी रंगायतनमध्ये काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून काही दिवसांपुर्वीच ठरलेल्या या कार्यक्रमाला निवृत्त न्यायाधीश, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृह निर्माण विभागाचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर हे उपस्थित राहणार आहेत. या महत्वाच्या व्यक्तींमुळे पोलिसांना त्या दिवशी याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागणार आहे. त्यातच रस्त्यावर सभा झाली, तर पोलिसांची तारंबळ उडू शकते.

दोन कार्यक्रमांचे एकाच वेळी नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवणे शक्य होणार नाही. त्याचबरोबर सभेमुळे परिसरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळेच सभेसाठी मुसा चौकाऐवजी शहरातील दोन ठिकाणांचे पर्याय सुचविले असून त्यात हायलॅंड मैदान आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या दोन ठिकाणांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र सभा त्याचठिकाणी होणार असल्याचे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी परवानगी दिली, नाहीतरी आम्ही त्याचठिकाणी सभा घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.